वारकरी संप्रदायाला भारतभर पोहोचवणारे लोकाभिमुख संत - समरसतेचे मेरुमणी नामदेव महाराज (भाग १)

Known Connections

वारकरी संप्रदायाला भारतभर पोहोचवणारे लोकाभिमुख संत - समरसतेचे मेरुमणी नामदेव महाराज (भाग १)

Known Connections

Background


Introductory Memo

Illustration of Sant Namdev – medieval Bhakti saint, poet, and social reformer
Sant Namdev – Devotional Poet and Social Reformer Remembered for His Role in the Bhakti Movement
Organiser.org

मध्ययुगीन भारतावर मोठा प्रभाव टाकणारे बहुभाषिक संत म्हणून प्रख्यात नामदेवांचे, वारकरी संप्रदायात वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. मराठी, हिंदी, पंजाबी इत्यादी विविध भाषेत अभंग लिहून त्यांनी वारकरी संप्रदायाचा भारतभर प्रचार केला. गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश भागात संचार करत त्यांनी उत्तर भारतात सर्वदूर हरिनामाचे बीज तर पेरलेच, पण दक्षिण-उत्तर संस्कृती संगम देखील घडवून आणला. एखाद्या उत्तम संघटकाप्रमाणे, नामाच्या भाव सूत्रात विविध प्रदेशांतील समाजमने, त्यांनी एकत्र गुंफली. हे करत असताना त्यांनी वर्ण, प्रांत, भाषा, व्यवसाय इत्यादी भेदभावाला छेद देत सामाजिक समरसता देखील वाढवली. संत नामदेवांचे अभंग पाठ्यपुस्तकात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याट येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच, संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्या संजीवन समाधीच्या ६७५व्या सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिली. यानिमित्ताने, संत नामदेव यांच्या अद्वितीय कार्याचा आढावा घेणाऱ्या मालिकेतील हे पहिले पुष्प…

1. Analytical View

संत नामदेव महाराजांनी मानवतेचा विचार करून आपल्या साहित्यात लेखन केले. त्यांनी २२ राज्यांत जाऊन भागवत संप्रदयाचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांच्या बालकविताही मराठीत आहेत. संत नामदेव महाराजांचे हे समरसतापूर्ण आणि सर्वसमावेशक विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिपादित केली.

संत नामदेव यांचे कार्य आणि कर्तृत्व असामान्य असल्यानेच देशभरातील लोकांसाठी ते श्रद्धास्थान बनले आहेत. मध्ययुगीन भारताच्या धार्मिक इतिहासाची काही सोनेरी पाने, संत नामदेवांच्या महान कर्तृत्त्वाची साक्ष देण्यासाठी, आजही उत्सुक असलेली आढळतात. शिखांच्या आदिग्रंथातील 'बाबा नामदेवजी की मुखबानी'तून, संत कबीर कमालांच्या हिंदी अभंगांतून, व उत्तर भारतातील सर्व ठिकाणी परसलेल्या संत नामदेवांच्या शेकडो मठमंदिरांतून, त्यांचे कर्तृत्त्व अक्षर शिल्पित झाले आहे.

सामान्यांच्या लोकबोलीतून अभंग गाऊन, संत नामदेवांनी धर्म मंदिराचे बंद दरवाजे उपेक्षित-वंचितांसाठी उघडले. वर्णभेद, प्रांतभेद, भाषाभेद, व्यवसाय भेद इत्यादी संकुचित कल्पनांचा निरास करून, भक्तश्रेष्ठ नामदेवांनी भक्तीच्या अनुषंगाने, समता आणि मानवता या तत्त्वांचा कृतिशील प्रसार केला. त्यांच्या मराठी. आणि हिंदी अभंगवाङ्गयातून आणि विविधांगी कार्यातून, त्यांच्या समताशील दृष्टिकोनाची ओळख पटते आणि त्यांच्या समाजाभिमुखतेचा स्पष्ट प्रत्यय येतो. त्यांची भक्ती समाजपराङमुख नव्हती. जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे, ही त्यांची धारणा त्यांच्या पुढील अभंग चरणातून उमजून येते:

सर्वांभूती विठ्ठल आहे आहे साचे।
हे तंव वेदींचे वचन जाण ।।
मार्ग हाचिं सोपा गेले मुनिजन।
जनी जनार्दन हाचि भावो ।। (संत नामदेव ११०२)

अत्यंत प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत विठ्ठल भक्तीच्या बळावर, सर्वसामान्य जनतेचे त्यांनी धर्म नेतृत्व केले. स्वतः उच्चारलेली सामाजिक सुधारणेची तत्त्वे आचरणात आणून दाखविण्याचे धैर्य देखील त्यांनी वेळोवेळी दाखवले. संत नामदेवांच्या या कार्याच्या या सर्वसमावेशक आणि समरसता पूरक स्वरूपातून वारकरी संप्रदायाच्या लोकाभिमुखतेचाही आविष्कार होतो.

कर्मकांडाचा निरास

संत नामदेव यांच्या काळातील सामाजिक जीवन हे प्रामुख्याने धर्माधिष्ठित होते. व्यक्ती, कुटुंब आणि समाज या तिन्ही स्तरांवर धार्मिक रूढींचा जबरदस्त पगडा होता. मनुष्याच्या दैनंदिन क्रियांनाही धर्मकर्मांनी व्यापून टाकले होते. धर्माचा आत्यंतिक प्रभाव समाज जीवनावर पडल्यामुळे, कर्मकांडाचे स्तोम माजले होते.

व्रतांमुळे कर्मकांडाचा अतिरेक झाला. त्यामुळे कर्मठताही आली. मंत्रापेक्षा तंत्राला श्रेष्ठत्व प्राप्त झाले. अंधश्रद्धा प्रबळ झाल्या. जीवन धार्मिक रूढी, रितीरिवाज आणि कर्मकांडाच्या कठोर चौकटीत जखडले गेले. त्या चौकटीचे उल्लंघन हे पाप ठरले. त्या पापांच्या क्षालनार्थ प्रायश्चित्तविधी आले. धार्मिक रूढींचे पालन न करणाऱ्यांना समाज बहिष्कृत करण्यात येत असे. कर्मठांनी ज्ञानदेवांच्या आई वडिलांना देखील बहिष्कृत करून, देहान्त प्रायश्चित दिले होते. संत नामदेवांच्या समोर कर्मकांडाचा हा इतिहास उभा होता.

संतश्रेष्ठ नामदेवांनी धर्माला कर्मकांडाच्या शृंखलातून मुक्त करून भक्तीच्या मार्गाला लावले. विधिनिषेधांच्या आहारी गेल्याने अहंकार वाढतो याची रोकड्या शब्दात, त्यांनी सर्वांना जाणीव करून दिली. या बाबतीतला स्वतःचा अनुभव त्यांनी सांगितला तो असा:

तत्त्व पुसावया गेलो वेदज्ञांसी।
तंव भरले त्यापासीं विधिनिषेध ।।
तया समाधान नुमजे कोणे काळीं।
अहंकार बळी झाला तेथें।।
स्वरूप पुसावया गेलो शास्त्रज्ञासी।
तंव भरले तयापाशीं भेदाभेद ।।
एकएकाच्या न मिळती मतासी।
भ्रांत गर्वराशी भुलले सदा।। (संत नामदेव १६१०)

या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विठ्ठलनामाचे सुलभ परमार्थ साधन समाजाला कथन केले ते असे:

तप तीर्थ दान हे सर्व कुवाड।
नाम एक वाड केशवाचें।। (संत नामदेव १०९४)

नाही काही क्लेश न करी सायास दृढ धरी विश्वास हरिनामीं।। (संत नामदेव ११४६)

मंत्रतंत्राचा बडिवार मांडणाऱ्यांना त्यांनी बजावले:

मंत्र यंत्र दीक्षा सांगतील लक्ष। परी राम प्रत्यक्ष न करी कोण्ही ।। (संत नामदेव १४७४)

पांडुरंग नामाच्या स्मरणाने मनुष्य शुद्ध होतो आणि त्याचे ऐहिक व पारलौकिक असे दुहेरी कल्याण होते, हा दिलासा सर्वसामान्यांना त्यांनी दिला.

नामें सदा शुद्धि प्राणिया होतसे । नामापाशीं असे भुक्तिमुक्ति ।। (संत नामदेव ९७६)

कलियुगात कर्मकांडाचे श्रम न करता, नामाचा आश्रय करा, हा हितोपदेश त्यांनी समाजाला केला.

कलीमाजीं नाम सुलभ सोपारे।
यालागीं आदर नामीं धरा ।।
आणिक साधनें आहेती उदंड।
सेवितां वितंड कष्ट तेथे।। (संत नामदेव १०९०)

जातिभेदातीत धार्मिक समरसतेचा पुरस्कार

भारतीय लोकजीवनातील कर्मकांडाचा निचरा करताना, खुद्द संत नामदेवांनाच, वर्णभेद आणि जातिभेद यातून उफाळणाऱ्या विषमतेचे चटके सहन करावे लागले. त्यांच्या कालखंडात, वर्गांचे आणि जाति-उपजातींचे वेगवेगळे, सवतेसुभे स्वतःच्या चौसीमा ठरवून, सामाजिक व्यवहार करीत होते. प्रत्येक जमातीने स्वतःभोवती एकेक कुंपण घातले आणि एकमेकात दुरावा निर्माण केला. या पंक्तिप्रपंचामुळे समाज विस्कळीत झाला. वर्णात आणि जातीत उच्चनीचतेची भावना रुजली. अंत्यजांना समाजात स्थान उरले नाही. वंचितांना गावसीमेवर टाकले गेले. उपक्षितांच्या जीवनाची परवड झाली. नैराश्य आणि वैफल्य यांच्या अंधारात चाचपडत ते कसेबसे जगू लागले. देवमंदिरांचे दरवाजे सर्वसामान्यांना बंद झाले. संत नामदेवांच्या स्वतःच्या आयुष्यातील पुढील प्रसंग जातिभेदाच्या दाहक परिणामावर भेदक प्रकाश टाकून जातो.

हीन दीन जात मोरी पंढरीके राया। ऐसा तुमने नामा दरजी कायकू बनाया।।
टाळ बिना लेकर नामा राऊलमें आया। पूजा करते बह्मन उन्नें बाहेर ढकाया ।। (संत नामदेव २१४२)

2. News at Glance
3. By The Numbers

🚀 Coming Soon

We’re building something amazing.

4. Academic Insight
5. Social Media Pulse
6. On Our Reading List


Known Connections

Infopack

Show More

Individual

Show More

Organisation

Show More

Narratives

Show More

Activism

Show More

Propagation Medium Used

Show More
Show Connections