Background
गेले दोन-चार दिवस महाराष्ट्र आणि उत्तर भारताच्या काही भागांत टिपू सुलतान आणि त्याच्या वारशावरून वाद निर्माण झाले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे त्याने ब्रिटिशांविरुद्ध दिलेला लढा. परंतु, केवळ ब्रिटिशांचा विरोधात लढा दिला म्हणून कोणी आपोआप 'स्वातंत्र्यसेनानी' ठरत नाही. ऐतिहासिक नोंदीनुसार, टिपू सुलतान हा त्याच्या वडिल हैदर अली यांच्यासारखाच मुस्लिम धर्माचा प्रचार करणारा त्याप्रमाणे धर्मांतर या हेतूंनी प्रेरित होता. त्याने मोठ्या प्रमाणावर हिंसाचार, सक्तीचे धर्मांतर आणि हिंदूंचा छळ केला. दक्षिण भारतात त्याची प्रतिमा सर्वमान्य नायकाची नक्कीच नव्हती आणि नाही. दक्षिण भारतात टिपू सुलतानबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे, असे मुळीच नाही. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूच्या अनेक भागांत त्याला 'नायक' म्हणून पाहिले जात नाही. उलट, त्याने केलेल्या क्रूर कृत्यांमुळे आजही तिथल्या लोकांच्या मनात त्याच्याबद्दल अत्यंत कटू आणि क्लेशदायक आठवणी आहेत. असा एक समज आहे की, दक्षिण भारत कट्टरपंथी इस्लामी आक्रमकांपासून सुरक्षित राहिला कारण मुघल तिथे पोहोचू शकले नाहीत. मात्र, म्हैसूरच्या हिंदू वडियार राजांची सत्ता बळकावणाऱ्या हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान (१७५१-१७९९) यांनी केलेले अत्याचार हे सिद्ध करतात की, दक्षिण भारतातही धार्मिक कट्टरता पसरवण्याचे प्रयत्न झाले होते. दुर्दैवाने, काँग्रेस आणि स्वतःला 'धर्मनिरपेक्ष' म्हणवून घेणाऱ्या काही इतिहासकारांनी टिपूला 'स्वातंत्र्यसेनानी' म्हणून रंगवले. परंतु, कागदपत्रे त्याच्या चारित्र्याबद्दल वेगळेच सांगतात. १७८२ ते १७९९ दरम्यान टिपूने केरळ (मलबार), कर्नाटक (कूर्ग आणि मेलकोट) आणि तामिळनाडूमध्ये हिंदूंविरुद्ध हिंसाचार, मंदिरे पाडणे आणि सक्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याच्या मोहिमा राबवल्या होत्या.
टिपूने दक्षिण भारतावर राज्य करण्यासाठी परकीय शक्तींची मदत
विविध नोंदींनुसार, टिपू सुलतानला संपूर्ण दक्षिण भारतावर आपले वर्चस्व निर्माण करायचे होते आणि स्वतःला एका विशाल साम्राज्याचा सम्राट म्हणून प्रस्थापित करायचे होते. मात्र, त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यात ब्रिटिश हा सर्वात मोठा अडथळा ठरू शकतात, असे त्याला वाटले आणि म्हणूनच तो ब्रिटिशांविरुद्ध लढला. त्याच्या या मोहिमांमध्ये कोणतीही भारतीय राष्ट्रवादाची प्रेरणा नव्हती. त्याने फ्रेंचांशी संपर्क साधला कारण त्याला वाटले की, ब्रिटिशांचे हे युरोपीय शत्रू त्याला मदत करू शकतील. तसेच, ब्रिटिशांचा पराभव करण्यासाठी त्याने तुर्की, अफगाणिस्तान आणि इजिप्तकडेही मदत मागितली. जर तो खरोखरच कट्टर राष्ट्रवादी असता, तर त्याने भारतीय भूमीचे परकीय आक्रमकांपासून रक्षण करण्यासाठी उत्तर भारतातील इतर राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून त्यांची मदत घेतली असती. प्रत्यक्षात, तो एक क्रूर आणि धर्मांध इस्लामी शासक होता. 'मातृभूमी'चे माजी संपादक व्ही. एम. कोराथ यांच्या लेखनानुसार, टिपूची युद्धगर्जना 'जेहादी' स्वरूपाची होती – 'तलवार' (मृत्यू) किंवा 'टोपी' (सक्तीचे धर्मांतर) – यावरून त्याच्या लष्करी मोहिमांचे खरे स्वरूप स्पष्ट होते. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूच्या भागांत त्याने नेमक्या याच मार्गाचा अवलंब केला.
तामिळनाडूतील टिपूच्या हिंसक मोहिमा
कर्नाटक आणि केरळमधील टिपूच्या अत्याचारांचे अनेक समकालीन पुरावे आणि अनुवादित कागदपत्रे उपलब्ध आहेत, परंतु तामिळनाडूच्या काही भागांतील त्याच्या क्रूर मोहिमांबद्दल तुलनेने कमी चर्चा केली जाते. ऐतिहासिक नोंदींनुसार, हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान या दोघांनीही सध्याच्या तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली, तिरुवन्नमलाई, कोईमतूर, इरोड, कुंभकोणम आणि दिंडीगुल यांसारख्या भागांत हिंसक मोहिमा राबवल्या होत्या.
मंदिरांच्या विश्वस्तांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी टिपू कुप्रसिद्ध होता. श्रीरंगम मंदिरातील त्याच्या कृत्यांची नोंद अशी आहे: "टिपूने सहा दिवस मंदिरात मुक्काम ठोकला आणि मंदिर उद्ध्वस्त न करण्यासाठी १ लाख 'वराह' (सोन्याची नाणी) खंडणी मागितली. रंगराजा वधुला देशिका यांच्या नेतृत्वाखालील मंदिराच्या वंशपरंपरागत विश्वस्तांनी मंदिर वाचवण्यासाठी या खंडणीबद्दल तडजोड केली."
सीताराम गोयल यांनी त्यांच्या 'हिंदू टेम्पल्स ऑफ इंडिया: व्हॉट हॅपन्ड टू देम' या महत्त्वपूर्ण पुस्तकात नमूद केले आहे की, टिपूने पाडलेल्या हिंदू मंदिरांच्या साहित्याचा वापर करून अन्नामलाई किल्ल्याची दुरुस्ती केली होती. त्याचप्रमाणे, कोईमतूरमध्ये एका मंदिराच्या जागी मोठी मशीद बांधण्यात आली, ज्यासाठी पुन्हा पाडलेल्या मंदिरांच्या अवशेषांचाच वापर केला गेला. हे सर्व प्रकार धार्मिक कट्टरतेचे प्रतीक असून, टिपू हा 'धर्मनिरपेक्ष' नव्हता हे यावरून सिद्ध होते.
कर्नाटक: हैदर आणि टिपूच्या धर्मांधतेचा बळी
हैदर अलीला म्हैसूरच्या तत्कालीन महाराजांनी तामिळनाडूतील दिंडीगुल येथे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाठवले होते. तिथे गेल्यावर हैदर अलीने आपला इस्लामिक प्रभाव वाढवला आणि अखेरीस म्हैसूरच्या राज्याची सत्ता बळकावली. पुढे त्याने आपला मुलगा टिपू सुलतानला आपला वारस म्हणून घोषित केले. टिपूने ब्रिटिशांचा प्रभाव रोखण्यासाठी कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांत लष्करी मोहिमा काढल्या, पण या प्रवासात त्याने लूटमार, जाळपोळ आणि विद्ध्वंसाच्या खुणा मागे ठेवल्या.
कर्नाटकात, १७८५ मध्ये टिपूच्या सैन्याने कूर्ग (कोडगू) ला लक्ष्य केले. तिथे स्थानिक कोडवांचे सक्तीने धर्मांतर करण्यात आले, महिला आणि मुलांना गुलाम बनवले गेले आणि ज्यांनी प्रतिकार केला त्यांना हत्तीच्या पायाला बांधून ते मरेपर्यंत ओढत नेऊन ठार मारले. कोडवा हा एक लढाऊ समाज असून त्यांनी टिपूच्या सैन्याचा दीर्घकाळ धैर्याने प्रतिकार केला होता. आजही १७८५ चे 'देवतु परंबू' (Devatu Parambu) हत्याकांड हा समाज विसरलेला नाही. यामध्ये टिपूने सुमारे ६०,००० कोडवांना (पुरुष, महिला आणि मुले) 'शांततेच्या चर्चेसाठी' निशस्त्र बोलावले आणि त्यांची क्रूर कत्तल केली. जे वाचले त्यांना सक्तीने धर्मांतरित केले गेले किंवा कैद करून त्यांचे अतोनात हाल केले गेले. या मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आजही कोडवा लोक दरवर्षी १२ डिसेंबरच्या संध्याकाळी दिवे लावतात.
सर्वात भीषण घटना म्हणजे १७९० चे मेलकोट हत्याकांड, ज्यामध्ये दिवाळीच्या रात्री ८०० ते १,२०० हून अधिक आय्यंगारांची कत्तल करण्यात आली. अनेक कुटुंबांना श्रीरंगपट्टणमच्या काळकोठडीत साखळदंडांनी बांधून ठेवण्यात आले आणि नंतर त्यांना फाशी देण्यात आली, ज्यामुळे हे शहर एका ओसाड वस्तीत रूपांतरित झाले. तेव्हापासून, हा समुदाय दिवाळी साजरी करत नाही. टिपूच्या सैन्याने क्रूरपणे मारलेल्या आपल्या समाजातील सदस्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ते हा दिवस 'शोक दिन' म्हणून पाळतात. वडियार आणि मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेचा भाग म्हणून हरिहरमधील हरिहरेश्वर आणि श्रीरंगपट्टणममधील वराहस्वामी यांसारखी मंदिरे पाडण्यात आली.
ज्या कर्नाटकात हे घडले तिथूनच काही आधुनिक 'धर्मनिरपेक्ष' लोक टिपूला जातीय सलोख्याचे प्रतीक म्हणून रंगवण्यासाठी पुढे आले आहेत. जेव्हा कर्नाटकातील काँग्रेस सरकारने टिपूला 'भारताचा महान सुपुत्र' म्हणून गौरवण्यासाठी 'टिपू जयंती' साजरी केली, तेव्हा कूर्गच्या कोडवांनी आणि मांडयम अय्यंगारांनी त्याला तीव्र विरोध केला. तरीही, काँग्रेसने 'टिपू जयंती' साजरी केली आणि आता या अत्याचारी शासकाला राष्ट्रीय नायक म्हणून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. जरी त्याचा जन्म भारतात झाला असला, तरी त्याच्या कृतीतून सांस्कृतिक राष्ट्रवादाबद्दल कधीही आदर दिसून आला नाही. त्याऐवजी, त्याच्या राजवटीत फक्त इस्लामी दहशत आणि धार्मिक कट्टरता पाहायला मिळाली.
टिपूचे मलबारमधील हत्याकांड
१७८८-८९ मध्ये टिपू सुलतानने मलबार (केरळ) वर केलेल्या आक्रमणादरम्यान हिंदू मंदिरांचा मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले. नायर, ब्राह्मण आणि इतर जातींच्या लोकांचे सक्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले. कैद्यांवर सक्तीने सुंता आणि गोमांस खाण्याची सक्ती केल्याचे अहवालही समोर आले आहेत. ब्रिटिश अधिकारी कर्नल फुलर्टन (Col. Fullarton) यांच्या नोंदींनुसार, टिपूच्या सैन्याने पालघाट किल्ल्याबाहेर ब्राह्मणांची कापलेली मुंडकी टांगली होती, जेणेकरून रक्षणकर्त्यांमध्ये दहशत निर्माण व्हावी. हे क्रूर हत्याकांड पाहून कालिकतचे हिंदू राजा 'झामोरिन' (Zamorin) यांनी पुढील कत्तल थांबवण्यासाठी शरणागती पत्करली.
विल्यम लोगन यांच्या 'मलबार मॅन्युअल'मध्ये (Malabar Manual) नमूद केले आहे की, त्रिचंबरम, थलिप्परंबू आणि थिरुवांगटू यांसारखी मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली होती. त्यांनी अनेक मंदिरांच्या अवशेषांच्या नोंदी केल्या आहेत. याव्यतिरिक्त, आक्रमणाच्या मार्गावर सक्तीच्या धर्मांतरामुळे मोपलाची लोकसंख्या वाढली. टिपूने एका आदेशात ५,००० हिंदूंना फासावर लटकवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्याने मंदिरांच्या जमिनी जप्त केल्या, परप्पनद राजा आणि निलंबूरच्या सरदारांसारख्या उच्चवर्णीय हिंदूंना धर्मांतर करण्यास आणि गोमांस खाण्यास भाग पाडले आणि प्रचंड क्रूरता दाखवली. जर्मन मिशनरी गुंटेस्ट आणि जेम्स राईस इनेस यांच्या नोंदीनुसार, तमिळ भाषिक क्षेत्रातील हिंदू-मुस्लिम वादाची मुळे याच छळाच्या घटनांमध्ये आहेत.
केरळमधील टिपू सुलतानच्या या धार्मिक नरसंहाराचा सर्वात गंभीर आणि ऐतिहासिक परिणाम म्हणजे 'मोपला' लोकसंख्येतील वाढ. अनेक दशकांनंतर, याच मलबार प्रदेशात ज्याला 'मोपला बंड' (Moplah Rebellion) म्हटले जाते, ते घडले (अनेकांनी याला 'बंड' म्हणण्यास विरोध केला आहे कारण यात प्रामुख्याने हिंदूंना लक्ष्य करण्यात आले होते). पुन्हा एकदा, इतिहासकाराचा बुरखा पांघरलेल्या काही तथाकथित बुद्धिजीवींनी या इस्लामी अत्याचारांना 'बंड' म्हणून पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक काँग्रेस नेते आणि अगदी 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनामुळे हिंदूंवर झालेल्या अकल्पनीय क्रूरतेच्या घटना जगासमोर आल्या. सक्तीच्या धर्मांतरातून टिपूने जो मोपला लोकसंख्येचा प्रश्न निर्माण केला, तो वेळोवेळी उफाळून येत राहिला आहे. एका अर्थाने, ही एक न भरणारी जखम बनली असून, यामुळे केरळमधील हिंदू, ख्रिश्चन आणि इतर गैर-मुस्लिम समुदायांना वारंवार त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दक्षिण भारताला वेगळे करण्याची मानसिकता-‘कटिंग साऊथ’
काही काळापूर्वी 'कटिंग साऊथ' (Cutting South) या वादग्रस्त शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. जरी आयोजकांनी यावर युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला, तरी लोकांपर्यंत त्यांचा खरा हेतू पोहोचला होता. अलीकडच्या काळात, दक्षिण भारत आणि उत्तर भारत सांस्कृतिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळे आहेत, हे दाखवण्यासाठी पुन्हा एकदा अनेक प्रयत्न केले जात आहेत.
कोणी भाषेतील फरकाबद्दल बोलत आहे, तर द्रमुक (DMK) सारख्या पक्षांचे काही नेते वारंवार हिंदू धर्मावर टीका करत आहेत. दुसरीकडे, काँग्रेस टिपू सुलतानसारख्या इस्लामी राज्यकर्त्याचे उदात्तीकरण करत आहे, जो दक्षिण भारतीयांसाठी प्रत्यक्षात एक अत्याचारी हुकूमशाह होता. काही लोक 'आर्य आक्रमणाचा सिद्धांत' जो आधीच पुराव्याअभावी फेटाळला गेला आहे त्याचा वापर करून लोकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. इतकेच नाही तर, काही जणांची मजल ही 'द्रविडीस्तान'च्या मागणीपर्यंत पोहोचली आहे.
हे सर्व फुटीरतावादी लोक टिपू सुलतानला एक राष्ट्रीय नायक म्हणून सादर करण्यात आणि दक्षिण भारतात त्याने केलेल्या क्रूरतेवर पांघरुण घालण्यात एकत्र आलेले दिसतात. हा त्यांचा आखलेला डाव आणि त्यामागचा उद्देश समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
सर्व पुरावे बघता टिपू सुलतान आणि हैदर अली यांच्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हिंदूवरील हे अत्याचार पिढ्यानपिढ्या स्मरणात आहेत. अशा परिस्थितीत टिपूला 'उदात्त', 'धर्मनिरपेक्ष' किंवा 'स्वातंत्र्यसेनानी' म्हणून चित्रित करणे चुकीचे आहे. विशेषतः दक्षिण भारतीयांनी या उदात्तीकरणाला कडाडून विरोध केला पाहिजे.
Introductory Memo